Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Latest News : महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत जुलै आणि ऑगस्ट अशा दोन टप्प्यात तब्बल 1 कोटी 59 लाख भगिनींना 4787 कोटींचा लाभ देण्यात आला आहे. अशातच महिलांसाठी असलेल्या या योजनेत काही अनुचित प्रकार घडत आहेत.
सातारा जिल्ह्यातील एका पुरुषाने 30 महिलांच्या आधार कार्डचा वापर करुन लाडकी बहीण योजनेसाठी 30 वेगवेगळे अर्ज केले होते. त्या 30 अर्जांपैकी 26 अर्जाना एकच बँक खाते संलग्न असल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली होती त्यामुळे घडलेला गैरप्रकार उघडकीस झाला होता.
अशातच आता आणखीन एक प्रकरण समोर आलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 12 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरल्याचे समोर आले आहे. या महाशयांनी तर आधारकार्डवर स्वत:च्या फोटोऐवजी महिलांचे फोटो लावून अर्ज केले आहेत.
छत्रपती संभाजीनगरमधील 12 पुरुषांनी वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज भरले होते. अर्ज भरताना त्यांनी, स्वत:च्या आधारकार्डचा फोटो अपलोड केला होता. तसेच त्यांनी हमीपत्रामध्येही स्वत:चे नाव लिहिले होते. पण फोटो अपलोड करताना त्यांनी महिलांचा फोटो अपलोड केला होता. बालकल्याण विभागाकडून अर्ज पडताळणी सुरु असताना हा प्रकार उघडकीस आला.
लाडकी बहीण योजनेसाठी केलेल्या अर्जाची सविस्तर तपासणी होणार नाही असा त्यांचा अंदाज होता. पण बालकल्याण विभागाकडून अर्ज छाननीचे काम सुरु असताना हा प्रकार लक्षात आला. प्रशासनाला या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.