Maharashtra Government News : नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारच्या भूमी अभिलेख विभागाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार दि. 1 नोव्हेंबर या तारखेनंतर नोंदणी केल्या जाणाऱ्या सातबाऱ्यावर आईचे नाव नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
मालमत्तेच्या मालकीमध्ये महिलांच्या नावांची नोंद करुन पती-पत्नी दोघेही एकत्रित मालक असावेत यासाठी महाराष्ट्रात मोहीम सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने देखील सरकारी कागदपत्रांमध्ये आईचे नाव प्राधान्यानं नोंदवले जावे यासाठी निर्णय घेतला होता. त्या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने भूमी अभिलेख विभागाने देखील आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भूमी अभिलेख विभागाच्या निर्णयानुसार, आता सातबारा उताऱ्यावर सुद्धा आईचे नाव नोंदवले जाणार असून 1 नोव्हेंबर पासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
महाराष्ट्र राज्यात 1 मे 2024 नंतर ज्यांचा जन्म झाला असेल त्यांच्या नावावर जमीन खरेदी केल्यास त्याची नोंद करताना संबंधिताच्या आईचे नाव सातबाऱ्यावर नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तेच सातबऱ्यावर संबंधिताच्या वडिलांचे नाव नोंदवणे बंधनकारक नसेल.
तसेच येत्या काळात फेरफारावर सुद्धा संबंधिताच्या आईचे नाव लावले जाणार आहे. विवाहित त्यांच्या वडिलांचे किंवा पत्नीचे नाव लावू शकतात. भूमी अभिलेख विभागाने राज्य सरकारकडे याबाबतचा प्रस्ताव पाठवला आहे. राज्य सरकारने यास मान्यता देताच या निर्णयाची अंमलबजावणी सुरु होईल.