Majhi Ladki Bahin Yojana : महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाईंदर मधील संतप्त महिलांनी थेट तहसीलदार कार्याल गाठत माझी लाडकी बहीण योजनेचे मिळालेले पैसे परत केले.
Maharashtra News : महाराष्ट्रातील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाईंदर मधील संतप्त महिलांनी तहसीलदार कार्यालयात जाऊन माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे परत केले. पैसे परत करत महिला म्हणाल्या ‘आम्हाला पैसे नको तर सुरक्षा हवी आहे’ महिलांची ही कृती चर्चेचा विषय बनली आहे.
बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर शाळेत झालेल्या लैगिक अत्याचाराचे तीव्र पडसाद संपूर्ण राज्यात उमटू लागले आहेत. नागरिकांमध्ये प्रचंड संताप असून शासनाविरोधात नागरिकांमध्ये रोष दिसून येतो आहे. अनेक सामाजिक संस्थासह ईतर राजकीय पक्षांकडून आंदोलन करून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. अशातच मीरा भाईंदर मधील महिलांनी शासनाचा विरोधात अनोख्या पध्दतीने निषेध नोंदवला. भाईंदर मधील महिला भाईंदर पश्चिम अप्पर तहसीलदार कार्यालयात गेल्या आणि त्यांनी लाडकी बहीण योजनेतून मिळालेले पैसे परत केले. आणी आम्हाला पैसे नको सुरक्षा हवी आहे असे ठणकावून सांगितले.
आम्हाला अशा पैशांची गरज नाही तर आम्हाला फक्त शासनाने सुरक्षा द्यायला हवी असे त्यांनी सांगितले. एकीकडे सरकार मुलींना सुरक्षा देऊ शकत नाही तर दुसरीकडे माझी लाडकी बहिण योजना सुरु करून सरकारकडून भुलवले जात असल्याचा आरोप या महिलांनी केला. या महिलांच्या कृतीची सोशल मीडियावर स्तुती होत आहे. पण महिला कार्यलयात आल्या होत्या तेव्हा तहसीलदार उपस्थित नव्हते. माझ्या कार्यालयात कोणीही आले नसल्याचा दावा अप्पर तहसीलदार दिनेश गौडं यांनी केला.