Mukhyamantri Teerth Darshan Yojana Maharashtra : राज्यातील ६० वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करता यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ या योजनेची घोषणा केली होती, त्यानुसार तीर्थदर्शन योजनेचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमध्ये भारतातील एकूण ७३ व महाराष्ट्रातील ६६ तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे.
देशातील मोठ्या तीर्थस्थळांना एकदातरी भेट देण्याचे अनेक ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते. पण घरची आर्थिक स्थिती ठीक नसल्याने किंवा सोबत येण्यासाठी कोणी नसल्याने त्यांची ही इच्छा अपूर्ण राहते. अशा ज्येष्ठ नागरिकांना यात्रांना जाता यावे, यासाठी राज्यातील सर्व धर्मीयांमधील ज्येष्ठ नागरिकांना भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेट देण्याची संधी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे.
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमध्ये भारतातील व महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला असून या योजनेंतर्गत निर्धारित तीर्थक्षेत्रापैकी एका यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एकदा लाभ घेता येणार आहे, यासाठी प्रवास खर्चासाठी कमाल मर्यादा प्रतिव्यक्ती ३० हजार रुपये इतकी असेल. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इत्यादी सर्व बाबींचा समावेश असेल .
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना पात्रता
- * लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- * लाभार्थी साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक असावा.
- * लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजारापेक्षा अधिक नसावे.
- * कुटुंबातील सदस्य आयकरदाता नसावा.
- * कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार अथवा खासदार नसावा.
- * कुटुंबातील सदस्य शासन सेवेतील कार्यरत कर्मचारी किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेणारा नसावा.
- * कुटुंबाकडे चारचाकी वाहन नसावे (ट्रॅक्टर वगळून).
- * लाभार्थी रोगाने ग्रस्त नसावा.
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहेत. लवकरच मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू केंद्राद्वारे विनामूल्य अर्ज सादर करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी बस प्रवासाचे आयोजन करण्यासाठी अधिकृत टुरिस्ट कंपन्या तसेच रेल्वे प्रवासासाठी आयआरसीटीसी समकक्ष अधिकृत कंपन्यांची निवड करण्यात येणार आहे.
फक्त निवड झालेला व्यक्तीच तीर्थयात्रेला जाऊ शकेल. त्याच्यासोबत इतर व्यक्तींना नेता येणार नाही. पण ७५ वर्षावरील अर्जदाराला त्याच्या जीवनसाथी किंवा सहायक यापैकी एकाला त्याच्यासोबत नेण्याची परवानगी असेल. सहायकाचे वय २१ ते ५० वर्षादरम्यान असावे. पती-पत्नीने स्वतंत्र अर्ज केला असल्यास व एकाची निवड झाली असल्यास दोघांना यात्रेला पाठविण्याबाबत समाजकल्याण आयुक्तालय निर्णय घेऊ शकतील. सोबत प्रवास करतांना मदतनीस नेण्याची सोय नसेल. तथापि दोघांचे वय ७५ वर्षापेक्षा अधिक असल्यास आणि अर्जात मदतनीस नोंदणीकृत असेल, तर तो पाठविला जाऊ शकतो.