How Much Gold Can You Keep At Home Legally in India : भारतात सण खास प्रसंगी आणि लग्नसमारंभात सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. काही लोक सनावाराला सोने खरेदी करणे समृद्धीचे प्रतीक मानतात. पण भारतात कायदेशीररित्या किती सोने घरात ठेवता येते हे तुम्हाला माहिती आहे का? सोन्याशी संबंधित आयकर विभागाने काही नियम जारी केले आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.
How Much Gold Can You Keep At Home As Per Income Tax Rules : घरात किती सोने ठेवता येते? फार पूर्वीपासून भारतात सोने खरेदी समृद्धीचे प्रतीक मानले जाते. देशात सण आणि लग्नसमारंभात सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. तर काही लोक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करतात. पण तुम्हाला माहित आहे का की तुम्ही घरात किती सोने ठेवू शकता? घरात सोने ठेवण्यासाठी काही कायदेशीर मर्यादा आहेत.
भारताच्या प्राप्तिकर नियमांतर्गत, घरात सोने ठेवण्याबाबत काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत. भारतातील सोन्याच्या साठवणुकीची मर्यादा केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून (CBDT) ठरवली जाते.
- * विवाहित महिला: प्राप्तिकर कायद्यानुसार, विवाहित महिला 500 ग्रॅम सोने ठेवू शकतात.
- * अविवाहित महिला: एक अविवाहित महिला 250 ग्रॅम सोने ठेवू शकते.
- * पुरुष: विवाहित पुरुष असो किंवा अविवाहित, पुरुष फक्त 100 ग्रॅम सोने ठेवू शकतात.
जर तुमच्याकडे या मर्यादेपेक्षा जास्त सोने असेल तर, तुम्हाला खरेदी केलेल्या सोन्याचा पुरावा, जसे की पावत्या किंवा सोन्याची खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे आलेल्या पैश्याचा स्त्रोत इ. चा पुरावा द्यावा लागेल.
वारसा हक्काने मिळालेल्या सोन्यावर कर बसतो का
वारसा हक्काने मिळालेल्या सोन्याबाबत लोकांना अनेकदा प्रश्न पडतो की या सोन्यावर कर आहे का? वारसा हक्काने मिळालेल्या सोन्याचा पुरावा कर अधिकाऱ्यांना द्यावा लागतो का? सरकारच्या मते, वारसा हक्काने मिळालेल्या किंवा घोषित उत्पन्नातून किंवा करमुक्त उत्पन्नातून खरेदी केलेल्या सोन्यावर कोणतेही कर दायित्व नाही, जोपर्यंत ते कायदेशीररित्या विहित मर्यादेत आहे.
जर तुम्हाला सोने वारसा हक्काने मिळाले असेल तर तुम्ही ते विकण्याचा निर्णय घेतल्याशिवाय त्यावर कोणताही कर लागू होत नाही. तथापि, जर सोन्याचे प्रमाण निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला सोने इच्छापत्र किंवा कायदेशीररीत्या मिळालेले आहे हे सिद्ध करणाऱ्या पावत्या किंवा कागदपत्रे सादर करावी लागतील. तुम्ही ही कागदपत्रे देऊ शकला नाही तर तुम्हाला कर ऑडिट दरम्यान जप्ती किंवा दंड होऊ शकतो.
सोन्याच्या विक्रीवर कर द्यावा लागतो का
सोने घरी ठेवण्यासाठी तुम्हाला कर भरावा लागत नाही पण त्याची विक्री केल्यास कर भरावा लागतो. तीन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ तुमच्याजवळ असणारे सोने विकल्यास, सोने विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यावर 20% दराने दीर्घकालीन भांडवली नफा कर आकारला जातो.
आणी तेच जर तुम्ही तुमचे सोने तीन वर्षांच्या आत विकल्यास, त्या वर्षाच्या तुमच्या उत्पन्नात नफा जोडला जाईल आणि तुमच्या वैयक्तिक उत्पन्नावर तुमच्या कर स्लॅबनुसार कर आकारला जाईल. म्हणजे जर तुम्ही फक्त दोन वर्षे सोने जवळ ठेवले आणि नंतर ते विकले, तर त्यातून मिळणारे उत्पन्न तुमच्या एकूण उत्पन्नात समाविष्ट केले जाईल आणि तुमच्या स्लॅबनुसार तुमच्यावर कर आकारला जाईल. तुम्ही तीन वर्षांनंतर सोने विकल्यास तुम्हाला इंडेक्सेशनचा लाभ मिळतो ज्यामुळे कराची रक्कम कमी होते.